तृतीय वेद विज्ञान संमेलन १० जानेवारी पासून

  तृतीय वेद विज्ञान संमेलन १० जानेवारी पासून ( Tṛtīyam Viśva-Veda-Vijñāna-Sammelanam )
  Posted On January 06,2018              

   विज्ञान भारती आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी २०१८ ते १३ जानेवारी २०१८ या दरम्यान ‘तृतीय विश्व वेद विज्ञान संमेलन’ डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात येत आहे. भारतीय वेद शास्त्राचे विज्ञानाच्या क्षेत्रात असलेले योगदान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैज्ञानिक विजय भटकर यांनी दिली. वेद विज्ञान संमेलनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते. 

  आधुनिक सर्व ज्ञानशाखांची पाळेमुळे आपल्याला या प्राचीन वाङ्मयात आढळतात असे अनेक विद्वानांचे मत आहे. शून्य, दशमानपद्धती, त्रिमितीचा सिद्धान्त, आयुर्वेद, योग, याच्याच जोडीने वस्त्रप्रावरणे, संगीतातील विविध वाद्य, ही देखील प्राचीन भारतीय विज्ञानाने आधुनिक जगताला आणि आधुनिक विज्ञानाला दिलेली भेट आहे. याचबरोबरीने प्रयोगशाळा कशी असावी, त्यातली व्यवस्था कशी असावी, उपकरणे कशी असावीत, ही उपकरणे तयार कशी करावीत इथपसून विविध संयुगे कशी तयार करावीत, त्यांचा प्रत्यक्षात कसा वापर व्हावा इत्यादी विषयांवर माहिती या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. याविषयी लोकांना अधिक माहिती नसते, त्यामुळे नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.


  या संबंधी अधिक माहिती वेद विज्ञान संमेलनाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

  या तीन दिवसीय कार्यक्रमात वेद आणि विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांवर अनेक दिग्गज आपली मते मांडणार आहेत. यामध्ये सोनल मानसिंग यांचे नृत्य आणि विज्ञान या विषयावर, बी.व्ही. दोशी यांचे स्थापत्य आणि वैदिक विज्ञान या विषयावर तसेच प्रा. पी.आर मुकुंद यांचे अभियांत्रिकी आणि वैदिक विज्ञान या विषयावर भाषण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वैदिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञान या विषयावर १० जानेवारी रोजी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. आणि वेद विज्ञान सृष्टी हे प्रदर्शन देखील भरविण्यात आले आहे. 

   VVVS Play Store iStore